दृश्यम अन् क्राईम पेट्रोल पाहून रचला कट, भावासह पुतण्या अन् गरोदर वहिणीला संपवले

रायगड : दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून लहान भावाने त्याचा मोठा भाऊ, त्याची गरोदर असलेली बायको आणि आठ वर्षांचा मुलगा या तिघांची हत्या केली. रेशनकार्ड आणि घरपट्टी वादातून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. नेरळमधील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडाची उकल झाली असून सख्ख्या भावानेच तिघांची हत्या केल्याचं समोर आलं.
ही घटना नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे चिकन पाडा येथे घडली. यात मदन पाटील, त्यांची गरोदर पत्नी अनिशा आणि त्यांचा आठ वर्षाचा मुलगा विवेक पाटील यांचा मृतदेह हा घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडला होती. यानंतर रायगड जिल्ह्यात या तिहेरी हत्याकांडात आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटना घडल्यानंतर दोन दिवसातच या आरोपीला रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसार माध्यमांशी या प्रकरणाचा खुलासा करत माहिती दिली.
अलिबाग गुन्हे अन्वेषण पथकाने या तपासाची सूत्रे हाती घेत सदर तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील याला ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण हकीकत समोरं आली आहे. रेशन कार्ड आणि घरपट्टी वादातून ही हत्या झाल्याची कबुली आरोपी हणमंत पाटील याने पोलिसांना दिली. यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेरळमधील ४० वर्षीय मदन पाटील, ३५ वर्षीय अनिशा पाटील आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा विवेक पाटील यांची ते शनिवारी रात्री झोपलेले असताना डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. तसेच व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. यातील आरोपीला दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून हा कट सुचल्याचं तपालात समोर आलं आहे.