प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. वडिलांच्या निधनामुळं अभिनेत्री मलायका अरोरासह तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांनी टोकाचं पाऊल का उचलले असावं? हे सध्या समोर आलेलं नाही.
दरम्यान ही घटना घडली तेव्हा मलायका काही कामानिमित्त पुण्यात होती. याबाबत माहिती मिळताच ती तातडीने मुंबईला रवाना झाली आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी 9 च्या सुमारास वांद्रे येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या दुःखद बातमीने संपूर्ण अरोरा कुटुंबाला धक्का बसला आहे.
या कठीण काळात अभिनेता अरबाज खान मलायका अरोराच्या घरी पोहोचला आहे. त्यांच्याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मराठे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.
कोण होते अिनल अरोरा
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांनी भारतीय नौदलात सेवा बजावली आहे. त्यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्प यांंच्याशी लग्न केले होते. गेल्या वर्षी 2023 मध्ये अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.
मलायकाने दिला अरबाजला घटस्फोट, तर दुसरी मुलगी अमृताला आहे दोन मुले
मलायकाने अरबाज खान सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मलायका ही सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा आहेत. तर, अनिल अरोरा-जॉयस यांची दुसरी कन्या अभिनेत्री अमृता अरोराने शकील लडकसोबत 2009 मध्ये विवाहबद्ध झाली. या दोघांना दोन मुले आहेत.