महाराष्ट्रराजकारण

काँग्रेसचा आणखी एक विरोधीपक्ष नेता भाजपात

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला. ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद भूषवले आहे. ते काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जातात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

काँग्रेसमध्ये मेरिटनुसार तिकीट मिळत नसल्याचा आरोप करत रवी राजा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. आज सकाळीच ते भाजप प्रदेश कार्यालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई महापालिकेत पाच वेळा नगरसेवक राहिलेल्या रवी राजा यांना काँग्रेसकडून सायन-कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या दाव्याला राज्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा दिला होता, मात्र हायकमांडने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. ४४ वर्षीय सेवेचा सन्मान न केल्याची केली खंत त्यांनी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कॅप्टन तमिळसेल्वनकडून १४ हजार मतांच्या फरकाने पराभूत होऊनही गणेश यादव यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा विशेषत: तमिळ आणि मराठी मतदारांमध्ये असलेला पाठिंबा कमी होईल. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अँटी इन्कम्बन्सीचा सामना करणाऱ्या कॅप्टन तमिळसेल्वन यांना बळ मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button