दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीच्या प्रचार करणार नाही, भाजपचा मलिकांना विरोध कायम

मुंबई : दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही, असे ठणकावून सांगत भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर तुमच्या प्रचाराची गरज नसल्याचे नवाब मलिकांनी प्रत्युत्तरात म्हटले आहे.
नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र भाजपाने त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. महायुतीत निर्माण झालेल्या मतभेदामुळे तणाव वाढला आहे. भाजपाच्या नेत्यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप लावले असून, त्यांच्या प्रचारात सहभाग घेण्यासही नकार दिला आहे.
नवाब मलिक यांनी भाजपाच्या आरोपांना ठामपणे प्रत्युत्तर दिले. मलिक म्हणाले, “दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करतात त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. गुन्हेगार, दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नाही. जे लोक माझ्यावर असे आरोप करत त्यांच्याविरोधात मी वरच्या न्यायालयात धाव घेणार आहे. मी बदनामीचा खटला टाकणार आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
भाजपाच्या आशिष शेलार यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेतली असून, “दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनाही या निर्णयाला समर्थन दिले आहे, ज्यामुळे महायुतीत मतभेद अधिक उघड झाले आहेत.
मलिक यांनी त्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर देताना, “कितीही मोठा नेता असला तरीही मी कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या प्रचाराला या असा मी आग्रह करत नाही. जनतेचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. या आधारावर निवडणूक लढतो. दाऊदचं नाव माझ्याशी जोडणाऱ्यांवर कायदेशीर करणार आहे. मी माझ्या विचारधारेला कधीही सोडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यावरून महायुतीमध्ये अखेरपर्यंत एकमत होत नव्हते. मात्र अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मलिक यांना AB फॉर्म देत मोठी खेळी खेळली. एकेकाळी मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करणारे भाजप नेते त्यांच्याच युतीतील पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याने मोठ्या अडचणीत सापडले आहेत.