धनंजय मुंडे-मुख्यमंत्र्यांची भेट होताच कराडची शरणागती, काहीतरी गौडबंगाल : संभाजीराजे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी २२ दिवसांपासून फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.
त्याच्या शरणागतीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. यामागे काही दडलंय का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, त्यांना पालकमंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाल्मिक कराड शरण आला हे सीआयडीचं यश नाही. त्याच्यावर थोडाफार मानसिक दबाव आला असेल म्हणून तो कदाचित शरण आला असेल. 22 दिवस तो हाती लागत नाही. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. याच्या मागे काही दडलंय का?, अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.
वाल्मिकवर 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सात आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही. त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं होतं तो शब्द पाळावा. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे. त्यांना पालकमंत्री करू नये, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यावर टीका केली आहे. ‘एक्स’च्या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. तसेच, सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड व्हिडीओ बनवतो आणि स्वत:ला क्लीन चिट देतो म्हणजे त्याच्यामागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असे म्हणत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. आपण सीआयडीसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती त्यानं व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर पुढच्या काही वेळातच त्यानं सीआयडी मुख्यालय गाठलं. आता तिकडे त्याची चौकशी सुरु आहे.