निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचे पथसंचलन
लोकशाहीच्या उत्सवासाठी पोलिसांकडून 'हम तैयार है ' चा संदेश

सांगोला : प्रतिनिधी
सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या कालावधीत कायदा- सुव्यवस्था रहावी आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी सांगोला पोलिसांनी कंबर कसली असून शहरातील विविध मार्गातील चौकातून पोलिसांनी ‘हम तैयार है’ चा संदेश देत आज सोमवारी सकाळी लक्षवेधी पथसंचालन केले.
पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी सदर जंगी पथसंचालनामध्ये सहभागी झाले होते.
सांगोला शहरातील मुख्य मार्गावरून पोलिसांनी पथसंचालन करून ‘कानून से बडा कोई नही’ असे दाखवत एकप्रकारे पोलीस प्रशासनाची ‘महाशक्ती ‘ दाखवली. निवडणूक कालावधीत कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही, असा संदेश दिला आहे.
मतदारांना आपला मतदानाचा हक्क आनंदात व निर्भयपणे बजावता यावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून लोकशाहीच्या उत्सवात ‘विघ्न’ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मात्र कायमचा बंदोबस्त करू आणि शांतता -सुव्यवस्था कायम राहील यासाठी पोलीस दक्ष असल्याचे पो. नि. भीमराया खणदाळे यांनी सांगितले.