पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप नेते विनोद तावडेंना बाविआने घातला घेराव
मुंबई : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजेच हे पैसे वाटप होत असताना भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेही उपस्थित असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरारमध्ये प्रसिध्द विवांता हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. आमदार क्षितीज ठाकूर सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर पोहोचले होते. यावेळेस या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. वाद अजून चिघळू नये म्हणून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले.
या प्रकरणासंदर्भात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले आहेत. “राष्ट्रीय सरचिटणीसांना कायदा नियम माहिती नाही का? वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन इकडे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात, लॅपटॉप मिळालेत. त्यात सगळे हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शर्म वाटते की नाही?” असा सवाल हिंतेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना हिंतेंद्र ठाकूर यांनी, “त्यांनी मला 25 फोन केले मला. अरे बाबा मला जाऊ द्या ना! चूक झाली, असं ते म्हणाले. यांच्या चुका माफच करत बासायच्या का?” असा सवाल उपस्थित केला. “हवं तर माझं फोन बूक तुम्ही चेक करु शकता,” असंही फोन केल्याचा दावा करताना हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसेच विनोद तावडेंनी, ‘झालं ते विषय संपवा,’ असं म्हटल्याचा दावा केला आहे. “त्यांनी लोकांसमोर येऊन लोकांना आणि पत्रकारांना उत्तरं द्यावीत, विषय संपेल. मी आता इकडे आलोय. आता बघतो,” असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.
निवडणूक आयोग कारवाई करणार नाही; हिंतेंद्र ठाकूर यांचा आरोप
“अशाप्रकारे पैसे वाटप आणि कार्यकर्त्यांची बैठक कशी घेऊ शकतात? या प्रकरणाचा पाठपुरवठा करतोय. पोलीस आणि निवडणूक आयोग काही कारवाई करतोय असं वाटतं नाही,” असंही हिंतेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. क्षितीज ठाकूर यांनी मारहाण केल्याच्या आरोपावर बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी, “क्षितीज ठाकूर मारहाण करणार माणूस नाही. आमच्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही असं मी पोलिसांना सांगितलं,” असंही म्हटलं आहे. तसेच भाजपाच्या एका कार्यकर्त्यानेच आपल्याला याबद्दलची माहिती दिली होती त्यानुसार क्षितीज ठाकूर यांना पाठवलं होतं असा दावा केला आहे.