निवडक मतदारसंघात उमेदवार, बाकी ठिकाणी आरक्षणास पाठिंबा देणाऱ्यास पाठिंबा : जरांगे पाटील
![](https://policenews.online/wp-content/uploads/2024/10/dflkdsgflk.jpg)
जालना : विधानसभा निवडणुकीत आपली काय भूिमका राहील, हे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. ते काही निवडक मतदारसंघातच उमेदवार देणार असल्याचे त्यांनी म्हटलं. ज्या मतदारसंघात उमेदवार देणार नाही, तेथील मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारास आम्ही पाठिंबा देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. त्या मतदारसंघातील उमेदवार आम्हाला ५०० रुपयांच्या बाँडवर मराठा आरक्षणासंदर्भात लिहून देईल, त्यांना पाठिंबा देण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं.
जरांगे यांच्या या घोषणेनंतर अंतरवाली सराटीत ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देत उमेदवार पोहोचत आहेत. त्यावर, आता मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देत येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. ज्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवार देण्यात येणार नाही, त्या मतदारसंघातील इतर पक्षाच्या उमेदवारांकडून बाँडवर लिहून घेतलं जाणार आहे. त्यामुळे, सध्या बाँड घेऊन अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मनोज जरांगे यांनी बाँड घेऊन येणाऱ्या उमेदवारांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय व्हायलयं कुणीही ५०० रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे यायलंय. त्यामध्ये, एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन ५०० रुपयांचा बाँड घेऊन लिहून देतोय. मराठ्यांचं मतदान आहे, म्हणून तुम्ही उगाच बाँड लिहित बसायचं असं करु नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा, किंवा येऊन भेटा. जिथं आम्ही उमेदवार देणार नाहीत, तिथं कुठल्या पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्याचे मेरीट आम्ही तपासणार आहोत. समजा एखाद्याने आम्हाला बाँडवर लिहून दिलं नाही तर त्या मतदारसंघातील अपक्ष किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठ्यांचं मतदान फिक्स आहे, पण तू काय केलंय लोकांसाठी, तूझं मतदार किती आहे, तुझं काम काय आहे हेही पाहिलं जाणार आहे. केवळ मराठ्यांचं मतदान मिळतंय म्हणून बाँडवर लिहून देतोय, हे चालणार नाही. आमच्याकडे डायरेक्ट बाँडवर लिहून आणून देऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, राज्यातील विविध मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांनी बाँडवर लिहून देण्यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेणे अपक्षित आहे.