सहा दिवस झाले, बिबट्या हाती लागेना; छत्रपती संभाजीनगर शहरात दहशत कायम
सिडकोसह चिकलठाणापर्यंत शोध मोहीम सुरूच : मध्यरात्री अफवेने गदारोळ

छत्रपती संभाजीनगर : गेल्या सहा दिवसांपासून शहराला दहशतीत टाकणारा बिबट्या अद्याप वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ४.१९ मिनिटांनी एन-१ परिसरात दिसून आला होता. तिथून त्यास चिकलठाणा एमआयडीसी मार्गे पळशी शिवारात जाण्यास मार्ग आहे. त्या ठिकाणाहून तो शहराबाहेर पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर वन विभागाच्या पथकाच्या माध्यमातून सेव्हन हिल ते चिकलठाणा परिसराचे शेवटच्या टोकापर्यंत सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. सरळ मार्गी पाच किलोमीटरचा हा परिसर आहे. मात्र पथकाच्या प्रत्यक्ष फेरीमध्ये त्याहून तिप्पट किलोमीटर परिसराची पाहणी करण्यात आली. एन-५ ते एन-८, नारेगाव, चिकलठाणा, चौधरी कॉलनी या भागातील प्रत्येक गल्ली, ओसाड ज्यावर मोठे गवत आहेत असे मैदाने तर एमआयडीसीमधील अनेक बंद पडलेल्या कंपन्या यात १६ टीमच्या माध्यमातून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र या संपूर्ण शोध मोहिमेत कुठेही बिबट्याचे पग मार्क, भक्षाचे निशाण काहीही मिळून आले नाही. आता शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याच्या वृत्तास देखील ८० तासांहून अधिक काळ उलटून गेला असल्याने तो शहराबाहेर पडला असल्याची शक्यता वन विभागाचे अधिकारी मंकावर यांनी व्यक्त केली आहे.
बिबट्या एक की दोन स्पष्ट होईना
शहरात दोन वेगवेगळ्या भागात बिबट्या आढळून आला आहे. मध्यभागी असलेला जालना रोड त्याने कसा ओलांडला याबाबत स्पष्टता नाही. कोणत्याही कॅमेऱ्यात तो दिसून आला नाही. तसेच गारखेडा परिसरात शुक्रवारी रात्री स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यात बिबट्या आढळून आला आहे. मात्र त्यानंतर तो कुठल्याही घरातील अथवा कोणा व्यक्तीला दिसला नाही. जर एक बिबट्या एन-१ मार्गे पळशी शिवारात गेल्याचा अंदाज लावला तरी गारखेडा परिसरातील बिबट्या कुठे गेला असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे बिबट्या एक कि दोन हे अजूनही अस्पष्टच आहे. तसेच उल्का नगरी येथील बिबट्या हा साताऱ्याच्या डोंगरातील तर एन १ भागातील बिबट्या हा पळशी शिवारातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अफवांचा बाजार ; भीती कायम
गादिया विहार परिसरात एका जणाने शुक्रवारी मध्यरात्री परिसरात बिबट्या बघितल्याची ओरड केली. वन विभागाचे पथक तातडीने तिथे पोहचल्यावर शेकडोंचा जमाव त्याठिकाणी जमलेला दिसून आला. प्रचंड गदारोळ आणि नागरिकांचा आरडाओरडा सुरु होता. पथकाने प्रत्यक्षदर्शीला विचारले असता त्याने तो भिंतीवरून उडी मारून गेल्याचे सांगतिले. त्यानुसार तासभर शोध घेतल्यानंतर पथकाने पुन्हा प्रत्यक्षदर्शीची चौकशी केली असता ती मांजर असावी असे तो स्वतः म्हणाला. तरीही पथकाने संयमाने नागरिकांना त्याठिकाणी बिबट्या नसल्याचे स्पष्ट करून सर्वांनी घरात जात काळजी घेण्याचे आवाहन केले. अशीच काहीशी घटना नारेगाव परिसरात देखील घडली असल्याची माहिती आहे.