बेपत्ता विवाहिता तपासात दिरंगाई, महिला पीएसआय निलंबित

मुंबई : बेपत्ता विवाहित महिला तपास प्रकरणी ढिलाई केल्यामुळे महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वऱ्हाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील एक विवाहित महिला ६ तारखेला घरगुती कारणांमुळे घरातून निघून गेली होती.
तिच्या सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती नातेवाईक परिचित आणि माहेरीही गेली नसल्याने तिचे पती आणि वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आले असता त्यांचा तात्काळ जबाब नोंदवून घेण्यात आला नाही. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बेपत्ता महिलेचा तपास सुरू केला नाही. महिला बेपत्ताप्रकरणी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश असताना ढिलाई केली. हा अत्यंत बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नैतिक दृष्ट्या जनमाणसांमध्ये पोलीस दलाविषयी संभ्रम आणि संशय निर्माण करून पोलीस दलाची प्रतिमा जनमाणसांत मलीन केली आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
बेपत्ता झालेली महिला शीळ फाटा येथील मंदिरात गेली होती. तिला चहातून गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, तसेच तिची निर्घृण हत्याही करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तिची बेपत्ता तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर पुढील प्रसंग घडला नसता, असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला.