पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची संकल्पना; जप्त मॉडिफाइड सायलेन्सरपासून उभारले ‘शांतीत क्रांती स्मारक’
छत्रपती संभाजीनगर : बुलेटला मॉडिफाइड सायलेंर लावून शहरभरात धुमाकूळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी पदभार घेतल्यापासून चांगलाच हिसका दाखविला. अनेक दिवस परिमंडळ एकच्या हद्दीत त्यांनी नाकाबंदी करून फटका बुलेटस्वार यांच्यावर धडक कारवाई केली. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरचे शांतता संदेश देणारे स्मारक करण्याची संकल्पना पोलीस उपायुक्त बगाटे यांनी मांडली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार व मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी देखील त्यांना साथ दिली. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी मंगेश पांचाळ आणि श्वेता बेलदार आणि एमजीएम विद्यापीठाचे आकाश बारोटे यांनी बुलेट सायलेन्सरपासून शांततेचा संदेश देणारे स्मारक तयार करून छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकात बसवण्यात आले आहे. एक उभा व्यक्ती व ही प्रतिकृती मिळून ११० सायलेंसर्स वापरण्यात आले.
कर्णकर्कश बुलेट सायलेन्सर पासून गेल्या काही महिन्यापासून शहरात बुलेट दुचाक्यांच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश फटफट आवाज करीत बुलेटस्वारांची मुजोरी वाढली होती. त्यावर छत्रपती संभाजीनगर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी धडक कारवाया करून सायलेन्सर जप्त करण्याच्या कारवाईचा धडाका लावला होता. जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सर पासून शांततेचा संदेश देणारे स्मारक तयार करून क्रांती चौकात बसवण्यात आले आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या कामासाठी विशेष सहकार्य करत क्रांती चौक येथील जागा व सुशोभीकरणासाठी मोलाची मदत केली. दोन प्रतिकृतीसाठी अजून ८० सायलेंसर्स वापरून प्रतिकृती तयार करत असे नितीन बगाटे यांनी सांगितले. “शांतीत क्रांती” असे स्मारकाचे नाव अमृता कीर्तने यांनी सुचविले.
– समाजाला त्रासदायक सायलेन्सर वापरू नका – नितीन बगाटे
कर्कश आवाजाच्या बुलेट संपूर्ण समाजाला त्रासदायक ठरत आहेत. मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी आणि अनियमित आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी लोकांचे नुकसान होऊ शकते आणि संपूर्ण समाजाला त्रास होतो. स्वत्तःची उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी कायदा मोडणे हानिकारक आहे आणि रस्त्यावर अपघात होऊ शकतात. सुधारित सायलेन्सर वापरू नका असे आवाहन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त आयपीएस नितीन दत्तात्रय बगाटे यांनी केले आहे.