राजकारण

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या सीए तरुणीच्या मृत्यूबाबत निर्मला सीतारमण यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : पुण्यातील 26 वर्षीय तरुणी सीए एन्ना सेबेस्टियन पेरियलनच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. कामाच्या अति ताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हंटले जात आहे. विविध राजकीय नेते मंडळी यावर प्रतिक्रिया देत आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मृत तरुणीच्या पालकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. कामाच्या ताणावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि अंर्तमनाची शक्ती आवश्यक आहे. तसेच याकरिता ईश्वराची कृपा सर्वात महत्त्वाची आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हंटले आहे. या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

अर्थमंत्री सीतारामण यांनी चेन्नईतील वैद्यकीय महाविद्यालयात एका कार्यक्रमाला संबोधित करताना एन्ना सेबेस्टियन पेरयिलच्या निधनाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, ‘आमची मुलं कॉलेज आणि विद्यापीठात अभ्यासासाठी जातात आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. सीएचे चांगले शिक्षण घेतलेल्या कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला कामाचा ताण सहन झाला नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी आम्हाला बातमीद्वारे कळलं की, ती कामाचा ताण सहन करू शकली नाही आणि तिचा मृत्यू झाला.”

“शैक्षणिक संस्था आणि कुटुंबांनी मुलांना तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले पाहिजे आणि त्यांना सांगावे की, तुम्ही कोणताही अभ्यास करा, कोणतीही नोकरी करा, त्यासोबतचा ताण सहन करण्याची आंतरिक शक्ती तुमच्यात असली पाहिजे. कारण हा ताण सहन करण्यासाठी आत्मविश्वास आणि अंर्तमनाची ताकद अतिशय महत्त्वाची आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फक्त ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे,” असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या टिप्पणीवरून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सत्ताधारी पक्ष आणि अर्थमंत्र्यांना फक्त अदानी आणि अंबानींसारख्या कॉर्पोरेट दिग्गजांचे दुखणे दिसते, कष्टकरी तरुण पिढीचे नाही. या ऐतिहासिक बेरोजगारीच्या युगात एन्नासारख्या प्रतिभावंतांना नोकरी मिळवून देण्यात यश आले तरी लोभी कॉर्पोरेट कंपन्यांकडून त्यांचे शोषण होते.’ पुढे वेणुगोपाल म्हटले की, ‘एन्नाला घरीच तणाव व्यवस्थापन कौशल्ये शिकवायला हवी होती, असे सांगून एन्ना आणि त्यांच्या कुटुंबाला दोष देणे हे अत्यंत क्रूर आहे. तिला दोष देण्याचा हा प्रकार घृणास्पद आहे. अशा विधानांमुळे आलेला संताप आणि द्वेष शब्दात मांडता येणार नाही. ‘ प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील सितारामण यांच्यावर टीका केली. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘मी संस्था आणि कुटुंबांना त्यांच्या मुलांना मदत करण्याचे आवाहन केले होते. माझा उद्देश पीडितेला कोणत्याही प्रकारे चुकीचे ठरवण्याचा नव्हता’, असे स्पष्टीकरण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button