परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष प्रशिक्षणासाठी इकबाल शेख यांची निवड
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल परराष्ट्र (विदेश) मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली आहे व काही कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करून ते विदेशात सेवा बजावणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर जिल्ह्यातील ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले आहेत.
सन २००३ मध्ये इकबाल शेख पोलीस दलात रुजू झाले. संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामाकरीता नियुक्त करण्यात आले. सीसीटीएनएस विभाग येथे कर्तव्यावर असताना इकबाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयास राज्यात अग्रस्थानि ठेवून वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय “फिरते चषक” मिळवून दिले आहे. तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेवून परिक्षेत्रिय, राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये प्राविण्य मिळवून ११ सुवर्ण, ९ रौप्य, १४ कांस्य पदके, राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक, ४० पेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकाविले आहेत.
सुवर्ण कामगिरी –
सन २०१९ मध्ये लखनऊ, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये “सुवर्ण पदक” प्राप्त करून भारत देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवून महाराष्ट्र पोलीस संघास ६१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच “सर्वसाधारण विजेतेपद” योगी अदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचे हस्ते प्रदान केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कडून १,००,०००/- रू.चे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. सन २०२० मध्ये राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचे वतीने आयोजित केलेल्या “गुड प्रॅक्टीसेस इन सीसीटीएनएस अँड आयसीजेएस २०२०’ परिषदेमध्ये “सिग्नीफिकन्ट कॉन्ट्रीब्युशन इन सीसीटीएनएस अँड आयसीजेएस २०२०’ या स्पर्धा प्रकारात त्यांनी भाग घेऊन वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय स्तरावर यश –
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र व सायबर पिस फौंडेशन नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस हॅकथॉन अँड सायबर चॅलेंजेस २०२१ या स्पर्धेत सहभाग घेवून “भारत देशातून १० वा” क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर लौकीकास आणले. सन २०२१ मध्ये त्यांनी सातत्याने पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातील सन्मानाचे मानले जाणारे “पोलीस संचालक पदक” व “विशेष प्रशंसापत्र” हे संजय पांडे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले होते.
सीसीटीएनएस प्रणालीचे प्रशिक्षक म्हणून विशेष ओळख –
सीसीटीएनएस प्रशिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती असून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, तुर्ची, नानवीज, जालना, खंडाळा इ. पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी तसेच पोलीस दलांत १०-२० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदार यांचे प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन, पोलीस स्टेशन मॅनेजमेंट प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रशिक्षण घेणारे अंमलदार तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ते पालीस उपअधिक्षक व परिवेक्षाधिन पोलीस अधीक्षक (IPS) दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांना सीसीटीएनएस, गुन्हे प्रतिबंध व गुन्हे प्रकटीकरणाकरीता केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, दिल्ली व केंद्रीय गृह विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या विविध पोर्टल्सचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल प्रशिक्षण देत आहेत.
विशेष छंद जोपासला –
पोलीस दलातील तनावपूर्ण कामकाजा व्यतिरिक्त त्यांनी सोलापूर, सातारा, लोनावळा, टाटा मुंबई मॅरेथॉन इ. मध्ये भाग घेवून २१ किमी च्या हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांना सायकलिंगची विशेष आवड असून सायकल लव्हर्स गृप च्या माध्यमातून त्यानी सोलापूर सायक्लोथॉन, सायकलिंग इव्हेंट, दैनंदीन सायकलींग करून ३००० किमी पेक्षा जास्त प्रवास पूर्ण करून निरोगी जिवनशैली जपलेली आहे. रनिंग व सायकलिंग हा विशेष छंद त्यांनी जोपासलेला असून विदेशात सुद्धा कामाव्यतिरिक्त सायकलिंग करणे हा त्यांचा मानस आहे.
विदेश मंत्रालयात अशी झाली निवड –
पोलीस हवालदार इकबाल शेख यांची कामगिरी उत्कृष्ट होतीच दरम्यान विदेश मंत्रालय, दिल्ली येथे अतिवरिष्ठ अधिकारी यांच्याकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी अत्यंत प्रभाविपणे व उत्तमरित्या दिलेल्या मुलाखतीमुळे विदेश मंत्रायलयाकडून दखल घेत विशेष प्रशिक्षण व विदेशातील सेवेची संधी त्यांना प्रदान केली आहे. त्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेश प्रभू, तत्कालीन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) विजया कुर्री, पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सीसीटीएनएस, सुरेश निंबाळकर गुन्हे शाखा, सहकारी अंमलदार फिरोज तांबोळी, संजय सावळे, स्वप्निल सन्नके, निलेश रोंगे, अभिजित कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मित्र परिवारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.