देश-विदेशराजकारण

हरियाणातील पराभवावर व्यक्त झाले राहुल गांधी म्हणाले…,

हरियाणातील विधानसभेच्या ९० जागांसाठी दि.५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर काल (दि.८ ऑक्टोबर) रोजी जम्मू-काश्मीरबरोबर हरियाणाचेही निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत ९० पैकी ४८ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. बहुमतासाठी ४६ जागांची गरज आहे. त्यामुळे भाजपाने यंदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

तर काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या असून त्यांचे हरियाणात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे या पराभवानंतर काँग्रेसवर विशेषता राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. निकाल लागल्यानंतर काँग्रेसकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, अखेर आता १२ तासानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभेच्या निकालावर एक्स अकाऊंटद्वारे पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्वात आधी जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभार मानतो. राज्यात इंडिया आघाडीचा विजय झाल्यामुळे संविधानाचा विजय झाला. लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय झाला आहे. आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आयोगाबद्दल तक्रारी येत आहेत. त्याबद्दलही कार्यवाही करू. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल हरियाणामधील सर्व नागरिकांचे मनस्वी आभार आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आम्ही सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठीचा आणि सत्याचा संघर्ष सुरूच ठेवू”, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, हरियाणामध्ये हॅट्रिक साधल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. या निकालानंतर भाजपने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. हरियाणा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी जिलेबीचा उल्लेख करत भाजपवर टीका केली होती, याचेच प्रत्यूत्तर म्हणून निकालानंतर भाजपने त्यांच्या बंगल्यावर जिलेबीचा बॉक्स पाठवल्याचे दिसून आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button