पिता भाजपकडून तर पुत्र शिवसेनेकडून, उमेदवारीसाठी निलेश राणे यांचे १९ वर्षात चौथे पक्षांतर

सिंधुदुर्ग : शिवसेना नंतर काँग्रेस-महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष-भाजप अशा प्रवास करत भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषद घेत राणेंनी आपला निर्णय जाहीर केला. उद्या ते शिवसेनेचा झेंडा हाती घेतील. जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असून नीलेश राणे तेथून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या नीलेश राणेंचे चौथे पक्षांतर मानावे लागेल. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिथून खासदारकीही मिळवली. त्यानंतर त्यांनी वडील नारायण राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. पुढे राणेंनी हा पक्ष भाजपात विलीन केला. त्यामुळे नीलेशही पर्यायाने भाजप सदस्य झाले. आता ते पुन्हा शिवसेनेत येत आहेत.
विशेष म्हणजे ही राजकीय तडजोड असली, तरी पिता भाजप खासदार, बंधू नितेश राणे आमदार आणि भाजप उमेदवार असून नीलेश आता शिवसेना उमेदवार असतील. म्हणजेच एकाच घरात आता दोन पक्षांचे सदस्य असतील.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये आलो. इथे खूप आदर मिळाला, सर्व नेत्यांनी प्रेम दिलं. भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावासारखं सांभाळलं. अध्येमध्ये अडचणी आल्या, पण त्यातून बाहेर काढलं, पक्षात स्थान दिलं. रवींद्र चव्हाणांनी भावासारखं सांभाळलं. उद्या शिवसेनेत प्रवेश नक्की झाला आहे. युतीत असताना नियमांनी काम करावं लागतं. लोकसभेला कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७ हजारांची लीड घेतली होती. ९० टक्के ग्रामपंचायती, बाजार समिती, कृषी सोसायटी जिंकल्या, सिंधुदुर्गची खासदारकीही जिंकलो, विधानसभाही जिंकणार, असा विश्वास नीलेश राणेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
बाळासाहेबांवर प्रेम आहेच. ते कायमच दैवतच आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही प्रेम होतं. काही राजकीय निर्णय घ्यावे लागतात. निवडणूक जिंकणं हेच आमचं लक्ष्य असतं. माझी स्पर्धा कुठल्या आमदाराशी नाही, माझ्या स्वतःशी आहे. मतदारसंघाचं चागलं करणं हे माझं लक्ष्य आहे. दहा वर्षात कुडाळ मतदारसंघ स्वतःची ओळख विसरला, ती परत मिळवून देणार आहे. २१ व्या शतकातील मतदारसंघ वाटला पाहिजे. माझ्या घरात अनेक वर्ष लाल दिवा होता. पण पक्षाला माझी जशी गरज, तसं मी काम करणार, असं नीलेश म्हणाले.