दहा-दहा बायका करा पण कोणाचा खून करू नका : वडेट्टीवार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
“सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हे महाराष्ट्र विकून काढतील तरी कारवाई होणार नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आज माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
वाल्मीक कराड महायुती सरकारचा जावई आहे का ?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ?
परभणी मध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिस आक्रमक होती, बीडमध्ये कारवाई करताना आता पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का?
सरपंच… pic.twitter.com/NyVTbNsXnD
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 29, 2024
“चित्रा ताई म्हणाल्या, मंत्री करु नये, तरी संजय राठोडांना मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही, लगेच काढून टाकलं आणि इकडे प्रेम करणारी असूदे प्रेम करून मारहाणही करता तुमची परवानगी असेल तर दहा-दहा बायका करा पण कोणाचा खून करू नका,” असे वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर यांचे नाव न घेता निशाणा साधला.
‘बीडमध्ये बिहार सारखी परिस्थिती’
पुढे ते म्हणाले, “बीडमध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही. परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारला आहे?,” असा सवालही त्यांनी केला.
“‘संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे. आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.