आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत या तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान
मुंबई : आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. तर बहुप्रतिक्षित असा भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाईल. आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते की ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार असल्याचेही वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला तरी हा सामना दुबईतच खेळला जाणार आहे. अंतिम सामन्याचे ठिकाण दुबई किंवा लाहोर असेल. जर भारत पात्र ठरला तर तो दुबईत खेळला जाईल तर इतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. फायनल ९ मार्च रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. सर्व संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
भारतीय संघाचे ग्रुप स्टेजचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. तर, इतर संघांचे सामने पाकिस्तानातच खेळवले जातील. पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील मैदानांवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानमध्ये प्रत्येक मैदानावर तीन गट सामने खेळवले जातील. दुसऱ्या उपांत्य फेरीचे आयोजन लाहोरमध्ये होईल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर लाहोर येथील मैदानावर ९ मार्च रोजी अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येईल. भारत पात्र ठरल्यास अंतिम सामना दुबईत खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही सामन्यांमध्ये राखीव दिवस असतील. तीन गट सामने आणि भारताचा समावेश असलेला पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब झाला. आता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळण्यास सहमती दिल्यानंतर आयसीसीनेही वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक
१९ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२१ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी-पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२४ फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
२६ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
२७ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
२८ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
१ मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
२ मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च- उपांत्य फेरी १, दुबई
५ मार्च- उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई.