पीव्ही सिंधू अडकणार विवाहबंधनात… जोडीदार करतात हे काम…
हैदराबाद : भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबद्ध होणार आहे. सिंधू ही पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक असलेले हैदराबादस्थित व्यंकट दत्त साई यांच्याशी लग्नगाठीत अडकणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेती असलेली सिंधूने अलीकडेच सय्यद मोदी इंटरनॅशनल खिताब जिंकला होता.
राजस्थानमधील उदयपूर येथे हा लग्नसोहळा 22 डिसेंबरला होणार आहे. तसेच 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. आपल्या होणाऱ्या नवरदेवाच्या कंपनीचा नवीन लोगो पी. व्ही. सिंधूने गेल्या महिन्यात लॉन्च केला होता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या मोठ्या बँकांसाठी जलद कर्ज प्रक्रिया आणि क्रेडिट स्कोअर जुळण्यासारख्या सुविधा प्रदानचे काम व्यंकट दत्ता साई करतात. त्याचसोबत टी20 लीग, आयपीएल या स्पर्धांसोबत पण त्यांचे नाव जोडलेले आहे.
सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी पीटीआयला सांगितले की, “दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिना अगोदरच ठरले होते. हीच एकमेव वेळ होती, कारण जानेवारीपासून त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त होईल.” ते पुढे म्हणाले, “म्हणून दोन्ही कुटुंबांनी 22 डिसेंबर रोजी लग्न समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पुढचा हंगाम खूप महत्त्वाचा असल्याने ती लवकरच तिचे प्रशिक्षण सुरू करेल.”
पी.व्ही. सिंधू काही काळ खराब फॉर्मशी झुंजत होती आणि ऑलिम्पिकमध्येही ती काही विशेष दाखवू शकली नाही. मात्र आता सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिनं आपला वेग पुन्हा मिळवला असून आगामी काळात तिला अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत, ज्यात भारतीयांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेतही दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत.