
पुणे : काल शहरात मध्यवर्ती भागात वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपांमध्ये त्याच्या बहिणी आणि जावयाचे नाव समोर आले आहे. वनराज आंदेकरच्या वडिलांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या हत्येच्या कटात मुलगी आणि जावयाचा हात आहे.
याप्रकरणी वनराज आंदेकर याच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी त्यांच्याच दोन मुली आणि जावयांच्या या कृत्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत १० आरोपी निष्पन्न केले असून ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या तपासानुसार कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादावरून हा खून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण होते वनराज आंदेकर
वनराज आंदेकर हे पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यांच्या आधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर आणि चुलत भाऊ उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते. वत्सला आंदेकर, वनराज यांच्या कुंटुबातील एक महिला, पुणे शहराच्या महापौर म्हणूनही कार्यरत होत्या. आंदेकर कुटुंबाचा पुण्यातील राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात मोठा प्रभाव आहे. वनराज आंदेकर याचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना गँगस्टर प्रमोद मालवडकर यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, बंडू आंदेकर यांच्यासह अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते, त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला.