लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, रूग्णलयात दाखल
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. अडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांत चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
न्यूरोलॉजी विभागात उपचार सुरू
अपोलो रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सूरी यांच्या देखरेखीखाली अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांच्या प्रकृतीविषयी वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध केले जाणार आहे.
याआधीही वारंवार रुग्णालयात दाखल
गेल्या काही महिन्यांपासून अडवाणी यांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. जुलै महिन्यात आणि त्याआधी जून महिन्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. २६ जून रोजी त्यांची लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना काही तासांतच डिस्चार्ज देण्यात आला होता.
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती गेल्या काही काळापासून अस्थिर असून त्यांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग पूर्णतः कमी झाला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे ते कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावत नाहीत.
भारतरत्न सोहळ्याला गैरहजर
यावर्षी मार्च महिन्यात अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ देण्यात आला. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे ते राष्ट्रपती भवनात उपस्थित राहू शकले नाहीत. त्याऐवजी राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसारख्या प्रमुख नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती.
अडवाणी यांचे राजकीय योगदान
लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणातील अति महत्त्वाचे नाव आहे. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी उपपंतप्रधानपद भूषवले होते. तसेच देशाचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. २०१५ मध्ये त्यांना ‘पद्म विभूषण’ हा राष्ट्रीय सन्मानही प्रदान करण्यात आला होता.