बेपत्ता महिला डॉक्टरची साई टेकडी भागात गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : देवळाई चौक भागातून बेपत्ता झालेल्या डॉक्टर महिलेने साई टेकडी परिसरातील डोंगरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुपाली नितीन बोरसे (५०, रा. प्रथमेशनगर, देवळाई चौक), असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या हाताची बोटे अपघातात तुटलेली होती.
चिकलठाणा पोलिसांच्या माहितीनुसार, १७ जुलैला रुपाली या मंदिरात जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. दरम्यान, त्यांचा शोध सुरू असतानाच पती नितीन बोरसे यांनी सातारा ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. तपास सहायक उपनिरीक्षक जगदाळे करीत असताना २१ जुलैला संध्याकाळी साई टेकडी परिसरातील डोंगरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला.
ही माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचे फोटो पोलिसांच्या वेगवेगळ्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठविले. ही माहिती नितीन बोरसे यांना मिळाली. त्यांनी साई टेकडी परिसरात जाऊन मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह घाटीत नेला. २२ जुलैला सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक उपनिरीक्षक एम के नागरगोजे करीत आहेत.