बिहार पॅटर्न राबवा, अन् मला मुख्यमंत्री करा… या चर्चेवर काय म्हणाले अजित पवार
महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा, अन् मला मुख्यमंत्री करा, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले, यावर अजित पवार यांना विचारले असता त्यांनी हे खोटे वृत्त असल्याचे सांगितले.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवारांनी अमित शाह हे दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली.
या बैठकीत अजित पवार यांनी बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, असे म्हटल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलचं रंगलं असून, विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील अजित पवरांवर निशाणा साधला आहे.
मात्र, अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्या दैनिकात जी अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची जी बातमी छापून आली आहे, ती धादांत खोटी आहे. असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, “महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार या सगळ्या थापा आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून विधानसभेच्या 288 जागांचं वाटप करु. बहुतांश जागांचे वाटप झालेले आहे आणि उर्वरित जागावाटपाचा फैसलाही लवकरच होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘जे लोक ही चर्चा करत आहेत, त्यांनाच याबद्दल विचारा. मी इतरांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणार नाही. सध्या आमचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे, महायुतीच्या सर्व घटकपक्षांना फायदा मिळवून देणे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल सांगतोय.
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे. सगळे घटकपक्ष आपापल्या परीने त्याचा प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीमधील सर्व घटकपक्षांना मिळाला पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील थेट म्हणाले…..
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “निवडणुकीच्या आधी अजित पवार अशी मागणी करतील, असं मला तरी वाटत नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे ते अशी काही मागणी करतील असं मला तरी वाटत नाही.
ही बातमी अशीच कोणीतरी पसरवलेली असेल. कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे अजित पवार अशी काही मागणी करतील असं मला वाटत नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.