राहुल गांधी होणार महाराष्ट्राचे जावई… राहुल गांधी-प्रणिती शिंदे यांचा विवाहाच्या अफवेला सोशल मिडीयात ऊत
सध्या राज्यात िवधानसभा निवडणुकाचा डंका वाजत आहे. मात्र सध्या वेगळ्याच विषयाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे, राहुल गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर संपूर्ण सोशल मीडियावर या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळतंय.
राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवांना सोशल मीडियावर पेव फुटले आहे.
प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील काँग्रेसचा तडफदार युवा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. अविवाहित असलेल्या प्रणिती यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी कधीच भाष्य केलं नाही. अशातच राहुल गांधींसोबत विवाह करण्याच्या अफवांचं उगमस्थान काय, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही राजकीय विश्लेषक या विषयावर चर्चा करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल आणि प्रणिती एकत्र चालतानाचे काही फोटोही मॉर्फ करुन शेअर करण्यात येत आहेत. मात्र याबाबत दोन्ही परिवारांपैकी कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
कोण आहेत प्रणिती शिंदे?
प्रणिती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांनी आपला राजकीय वारसा कन्या प्रणिती शिंदेंकडे सोपवला आहे. प्रणिती यांनी जाईजुई एनजीओमधून राजकीय आणि सामाजिक प्रवासाला सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सोलापूरमधून रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. प्रणिती शिंदे यांचा विजयही विशेष होता, कारण त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. या जागेवरून आधी भाजप नेते डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी खासदार होते.