एक पोलीस करणार ३० पोलीस कर्मचाऱ्यांइतके काम, काय आहे सरकारची योजना?
मुंबईकरांना लवकरच पाहायला मिळणार घोड्यावर बसलेले पोलीस
मुंबई : मुंबईकारांना आता शहरात घोडेस्वार पोलीस गस्त घालताना पाहायला मिळणार आहेत. घोडेस्वार पथकाला पुनर्जीवित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना घोड्यावर बसलेले पोलीस रस्त्यावर पाहायला मिळतील. दाव्यानुसार एक घोडेस्वार पोलीस गस्त घालणाऱ्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांइतके काम करू शकतो.
घोडेस्वार पथकासाठी सरकारने ३८.४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस लवकरच ३० घोडे खरेदी करणार आहे. गर्दीचे ठिकाणे, मोर्चे तसेच समुद्रकिनारे आणि पदपथांवर घोडेस्वार पथक गस्त घालणार आहेत. त्यामुळे मुंबईत घोडस्वार पोलीस पाहण्याची उत्सकुता असेल.
ट्रॅफिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याकरीता या घोडेस्वार पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. १९३२ साली घोडेस्वार पथकाला ट्रॅफिक संबंधी काही मुद्द्यावरून बरखास्त करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर घोडेस्वार पथक आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण, त्याला मुहूर्त मिळत नव्हता.
घोडस्वार पोलिसांचा फायदा काय?
एक घोडेस्वार पोलीस गस्त घालणाऱ्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांइतके काम करू शकतो. घोडेस्वार अत्यंत कमी वेळात जवळच्या ठिकाणी पोहोचू शकतो. वेग ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. पोलिसांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने गस्त घालू शकतात.
अशा प्रकारचे घोडेस्वार पथक गर्दीच्या ठिकाणी, समूद्राच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप फायद्याचे ठरू शकतात. या युनिटला वॉकी-टॉकी दिली जाते. पोलिसांना दिलेले घोडे हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे लोकांना या घोड्यांचा त्रास होणार नाही. आता प्रत्यक्षात घोडेस्वार पोलीस मुंबईकरांना कधी पाहायला मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.