बटेंगे तो कटेंगे घोषणेपासून पंकजा मुंडेचीही फारकत
सांगली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार हवा सुरू आहे. महायुतीच्या अजित पवार यांच्यापाठोपाठ भाजपच्याच पंकजा मुंडेंनी या घोषणेपासून फारकत घेतल्याचे िदसते.
मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि भाजपचे उमेदवार आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावर भाष्य केलं. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत, आपण सध्या बोलतोय एक, लिहतोय एक आणि मीडिया लगेच मागे लागते, सोशल मिडिया देखील खूप ताकदवान झालाय, असे म्हणत पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावरुन घुमजाव केला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणत्याही सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं नाही. प्रिंट मीडियामध्ये काय छापून आलं याच्यावर मी भाष्य अजिबात करणार नाही म्हणजे नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
योगी आदित्यनाथ यांची अनेक प्रचारसभांमध्ये दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटले की, “राज्यात अशा घोषणांची गरज नाही. त्याऐवजी विकासावर बोलायला पाहिजे. मी भाजपमध्ये आहे म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेचे समर्थन करणार नाही. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा पुढे म्हणाल्या की, “योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा त्यांच्या राज्यामध्ये वेगळ्या संदर्भासाठी दिली होती. मोदीजींनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिला असला तरी तो वेगळ्या संदर्भाने आहे. पंतप्रधानांनी जात-धर्म न पाहात सर्वांना समान न्याय दिला आहे.”
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही विरोध
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला विरोध केला होता. अजित पवार म्हणाले की, “अशा गोष्टी महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि आम्ही त्याच मार्गावर जाऊ. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याचा स्वीकार करणार नाही,” असे अजित पवार म्हणाले होते.