देशाची वेगाने प्रगती हे संविधानाचे यश : मुख्यमंत्री
मुंबई : शपथविधीनंतर आज नव्या सरकारचा पहिला दिवस आहे. आिण याच दिवशी (6 डिसेंबर) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. भारतरत्न डॉ.आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत.
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.
🕗 स. ८.१२ वा. | ६-१२-२०२४📍मुंबई.
LIVE | भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन#Maharashtra #DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDin https://t.co/bEDIPUA4En
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2024
यावेळी विहाराच्या बाहेर पोलिसांच्यावतीने आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच मोठा शासकीय कार्यक्रम 24 तासांच्या आत पार पडला. चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यांसह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,” देशाची वेगाने प्रगती हे संविधानाचे यश आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाकडं पाहून थक्क होतो. बाबासाहेब एक व्यक्ती नव्हे तर संस्था होते. देशापुढील कोणत्याही समस्येचं उत्तर संविधानात मिळते”.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. महायुती सरकारमधील तीनही प्रमुख नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उशिरा रात्री कोर्ट नाका परिसरातील भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो.डॉ. आंबेडकर यांनी अर्थतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ, विचारवंत आणि सुधारक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान दिले. त्यांनी आपले जीवन समतेसाठी आणि जाति-आधारित भेदभाव निर्मूलनासाठी समर्पित केले.