क्राइममहाराष्ट्र

नशेखोरी रोखण्यासाठी ‘लेडी सिंघम’वर जबाबदारी

अँटी नार्कोटिक्स सेल प्रमुखपदी पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : शहरात नशेखोरीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आल्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा (अँटी नार्कोटिक्स सेल) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दबंग पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांची पथकप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मदतीला एक अधिकारी आणि ८ पोलीस अंमलदार असे पथक देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

शहरात बटन, गांजा, ड्रग्स व इतर नशेच्या पदार्थांची विक्री होताना दिसून येते. तसेच क्षुल्लक कारणावरून चाकू, तलवारीने हाणामारी, लूटमार आणि स्ट्रीट क्राईम मोठ्याप्रमाणात वाढले आहे. भररस्त्यात महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार देखील हल्ली वाढले आहेत. या गुन्हेगारीचे मूळ नशेखोरी असल्याचे प्रत्येक घटनेमधून समोर येत आहे. हल्लेखोर हे कोणत्या ना कोणत्या प्रकारची नशा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नशेखोरी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडक धोरण राबविण्याचे ठरविले आहे. मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरात कामाचा अनुभव असल्यामुळे पवार यांनी प्रतिबंधात्मक कारवाया वाढविण्यासोबतच आता मोठ्या शहराप्रमाणे आपल्याकडेही अँटी नार्कोटिक्स सेल कार्यरत असला पाहिजे, असा निर्णय घेतला. या पथकाने प्रभावी कारवाया कराव्यात, असेही त्यांनी यापूर्वीच बोलून दाखविले आहे. त्यानुसार, शहरातील उस्मानपुरा, सिडको, वाळूज आणि सायबर पोलिस ठाण्यात कामाचा अनुभव असलेल्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची पथकप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी उस्मानपुरा येथे कार्यरत असताना एका कारवाईत बटन गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकलचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यावरून मेडिकलचा परवानाही रद्द झाला होता, हे विशेष. त्यामुळे नशेखोरांचा कायमचा बंदोबस्त करून विक्रेते देखील लवकरच गजाआड झाल्याचे पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. अँटी नार्कोटिक्स सेल नशेखोरांवर कडक कारवाई करेल. शाळा, कॉलेज, खुली मैदाने, शहरातील हायफाय हॉटेल्स टार्गेट करून हे पथक नशा करणाऱ्या आणि त्यांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या मोबाईल क्रमांकावर द्या नशेखोरांची माहिती
पोलीस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या अमली पदार्थ प्रतिबंध शाखेसाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ९५२९०१९०६१ या क्रमांकावर शहरात कोठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी आढळून आले तसेच नशेखोरांच्या टोळ्यांची माहिती कोणाकडे असेल तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हाट्सअपवर द्यावी. माहिती देण्याऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांनी कळविले आहे.

सेलमध्ये यांचा समावेश
पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह उपनिरक्षक संदीप शिंदे, अंमलदार लालखान जाफरखान पठाण, सतीश जाधव, संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, छाया लांडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पथकाची प्रमुख जबाबदारी

  1. नशेखोरांचे जाळे उघड करून प्रभावी कारवाई करणे.
  2. बटन गोळ्या, गांजा, ड्रग्जसह नशेच्या पदार्थांची विक्री थांबविणे, रॅकेट उघड करणे.
  3. नशेखोरीच्या आरोपींचे रेकाॅर्ड बनवून सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाया करणे.
  4. नशेखोरांच्या प्रमुख टोळ्या रेकॉर्डवर आणणे.
  5. गरजेनुसार एमपीडीए, मोक्कासारख्या कारवाया करणे.
  6. स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृतीपर कार्यक्रम घेणे
  7. युवकांना नशेपासून परावृत्त करणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button