महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बिबट्या रिटर्न’; पुन्हा धडधड वाढली

चिकलठाणा एमआयडीसीमध्ये सुरक्षारक्षकांना दिसला; वन विभागाची पुन्हा शोधमोहीम

छत्रपती संभाजीनगर: तब्बल नऊ दिवसांनंतर शहरात पुन्हा एकदा शनिवारी पहाटे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये बिबट्याचे दर्शन झाले. बीसीएल कंपनीच्या सरंक्षक भिंतीवर पहाटे साडेपाच वाजता सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसून आला. काही वेळाने बिबट्या लगतच्या झाडांमध्ये निघून गेला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक परिसरात दाखल झाले. कंपनीच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. तसेच घनदाट झाडीतून बिबट्या पुढे गेल्याचे निदर्शनास आले. तसेच एका झाडाखाली तो काहीवेळ दबा धरून असल्याचा खुणा आढळल्या आहेत. यासोबतच रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल अंगर येथील बनेवाडी परिसरात देखील बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे.

मागील आठवड्यात सोमवारी (दि. १५) शहरातील उल्कानगरी भागात बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. पहाटे साडेतीन वाजता उल्कानगरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी ( दि. १६) पहाटे शंभुनगरात पोद्दार शाळेच्या मागे बिबट्याचे दर्शन झाले. विविध भागात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या अफवा सुरू असतानाच बुधवारी ( दि. १७ ) पहाटे तर प्रोझोन मॉलमध्ये बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. मात्र, त्याच दिवशी पाहते सिडको एन- १ मधील एका शाळेच्याजवळ सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर बिबट्याचा थांगपत्ता लागत नव्हता. संशयित ठिकाणी पिंजरे लावून वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याचा शोध सुरू होता.

शनिवारी पहाटे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. येथील बीसीएल कंपनीच्या कुंपणावर सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसून आला. काही वेळातच बिबट्या तेथील झाडात पसार झाला. त्यामुळे शहराची पुन्हा धडधड वाढली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांना घाम फोडला होता. मध्यंतरी तो सारोळ्यात गेल्याचे स्पष्ट झाल्याने शहराने निश्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा चिकलठाणा एमआयडीसी भागात तो परतला असल्याची माहिती शहरात पसरताच पुन्हा चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button