संजय राऊत म्हणजे ‘भिकार संपादक’ : नामोल्लख न करता राज ठाकरेंची टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांचा नामोल्लख न करता, ‘भिकार संपादक’ असा उल्लेख केला आहे. आपण ठाकरे असून तोंड आपल्यालाही आहे असं म्हणत एक अपशब्दही वापरला. ते विक्रोळीत घेतलेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. संजय राऊत राहत असलेला भांडूप हा भाग विक्रोळी मतदारसंघात येतो.
“काही जागा आणणार म्हणजे आणणार कुठल्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल ते करुन घ्यावं,” असं म्हणत राज ठाकरेंनी विक्रोळीमध्ये जिंकायचंच असा निर्धार भाषणाच्या सुरुवातीलाच व्यक्त केला. “कोणी दादागिरीची भाषा करत असेल तर दुप्पट दादगिरीने उतरेन. मी हे तुमच्या टाळ्यांसाठी म्हणत नाहीये. समोरच्या एकदा आजमाववंच! या संपूर्ण अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटीक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहे. ते शोले म्हणजे होतं ना तुम दो मारो हम चार मारेंगे,” असं म्हणत राज यांनी थेट उल्लेख न करता राऊतांना आव्हान दिलं.
“घाण करुन टाकलं सगळं राजकारण! सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. यांनाही काही काम धंदे नाही सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण आणि काय बोलल्याचा नाहीये. कोण काय बोलतंय, किती खालच्या स्तराला जाऊन बोलतंय याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. हे जेव्हा दाखवतात तेव्हा जी येणारी लहान लहान मुलं आहेत, ज्या मुली राजकारणात येऊ पाहतात त्यांना वाटतं हेच राजकारण! असा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ होऊन किती वाट लागेल महाराष्ट्राची याची आपण कल्पना तरी करतोय का?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
“कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. याला वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना… त्यांना कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ XX समजू नये यांनी,” असंही राज राऊतांना इशारा देताना म्हणाले.