60 हजारात नवजात बालकाची विक्री, जोडप्याने आरोप फेटाळले
भुवनेश्वर : ओडिसा येथे एका जोडप्याने अवघ्या 60 हजार रुपयांसाठी 9 दिवसांच्या बाळाची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोडप्याने याच पैशातून नंतर बाइक खरेदी केली. या जोडप्याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. गरिबी आणि मूल वाढवण्यास असमर्थता यामुळे त्यांनी एका मुल नसलेल्या जोडप्याकडे बाळाला सोपवले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
रिपोर्टनुसार, ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील एका जोडप्यावर 9 दिवसांच्या बाळाला 60 हजार रुपयात विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याच पैशांनी त्यांनी नवीन गाडी खरेदी केली. त्यांनी मयूरभंज जिल्ह्यातील एका जोडप्याला बाळाची विक्री केली. या घटनेबाबत पोलिस आणि बाल कल्याण समितीला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाळाची सुटका केली.
या प्रकरणी बाळाची विक्री व खरेदी करणाऱ्या दोन्ही जोडप्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनी यामध्ये कोणताही पैशांचा व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. बाळासाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचे पालकांनी म्हटले आहे.
पैसे घेऊन बाळाची विक्री करण्यात आल्याचे आरोप महिलेने फेटाळले आहेत. ही महिला म्हणाली की, ‘मी एका बाळाला जन्म दिला. मात्र, पैशांभावी त्याचे पालन करू शकत नाही. त्यामुळे माझ्या बाळाला एका जोडप्याला दान केले. त्यांना मुल नव्हते. मी बाळाची विक्री केलेली नाही.’ दरम्यान, याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून दोन्ही कुटुंबाची चौकशी करत घटनेची सत्यता जाणून घेतली जात आहे.