साऊथ स्टार सामंथाच्या वडिलांचे निधन
मुंबई : साऊथ स्टार सामंथा रुथ प्रभू तिच्या आयुष्यातील कठीण काळातून जात असताना तिच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामंथाच्या वडिलाचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. वैयक्तिक आयुष्यात चढ -उतार येत असताना वडिलाचं छत्र हरपल्यानं तिला मोठा धक्का बसला आहे.
सामंथा रुथ प्रभू चे वडील जोसेफ प्रभू यांचं निधन नेमकं कशामुळं झालं, हे अद्याप समोर आलं नाहीये. एक पोस्ट शेअर करत तिनं वडिलांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने “आता आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा” असं लिहीत एक दुःखी इमोजी शेअर केली. या मोजक्या शब्दांत तिनं सर्वकाही सांगितलं आहे.
समांथा तिच्या वडिलांची खूप लाडकी होती. तिचे वडील कायमच तिचा आधार होता. नागा चैतन्यबरोबर घटस्फोट झाल्यावर तिचे वडील चर्चेत आले होते. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्यांचा घटस्फोट झाल्याची पुष्टी दिली होती आणि त्यांना यातून सावरायला थोडा वेळ लागेल असं म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी ते दोघेही त्यांचं आयुष्य नव्याने सुरु करतील अशी आशाही व्यक्त केली होती.
जोसेफ हे तामिळ अँग्लो इंडियन होते. त्यांनी कायमच तिच्या करिअरमध्ये तिची साथ दिली. त्यांच्या निधनाने समांथा आणि तिच्या कुटूंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यावर अनेकांनी कमेंट्स आणि पोस्टच्या माध्यमातून जोसेफ यांना श्रद्धांजली वाहिली तसंच समांथाने या दुःखातून लवकर सावरावं म्हणून प्रार्थना केली.
लहान असताना समांथाचं तिच्या वडिलांशी नातं फार ठीक नव्हतं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी खुलासा केला होता. तिच्या वडिलांनी तिच्या क्षमता कमी केल्याच्या क्षणांची आठवण तिने यावेळी सांगितली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला कसा संघर्ष करावा लागला हे तिने सांगितलं. हुशार असूनही समांथाने उत्तम शिक्षण घेतलं नाही याविषयी त्यांच्यात तणाव होता पण नंतर ही परिस्थिती सुधारल्याचं समांथाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
जोसेफ यांच्या पश्चात समांथा , तिची आई आणि त्यांची दोन मुलं जोनाथ, डेव्हिड असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीविषयी कोणतीही माहिती समजू शकली नाहीये.