एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक, उद्या मुख्यमंत्री करणार चर्चा
मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ऐन गणेशोत्सवादरम्यान पुन्हा एकदा राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, ही एक प्रमुख मागणी असून यासाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी काल राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीला उद्या, ४ सप्टेंबर रोजी बैठकीस बोलावलं आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही. तसेच, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी विनंती देखील केली.
मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका आहे. तर आता उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार असून, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.