‘तारक मेहता का उलटा चष्मा’तील सोनूने केले निर्मात्यावर छळाचे आरोप
सोनी सब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रियतेबरोबरच वादग्रस्तही ठरलेली आहे. १६ वर्षात अनेक कलाकारांनी शोचे निर्माते असित मोदींवर अनेक आरोपही लावले. त्यात लैंगिक छळाचे सुध्दा आरोप आहे. अशातच सोनू भिडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पलक सिंधवानीला निर्मात्यांनी नोटीस पाठवल्यानंतर तिने निर्मात्यांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे.
करार मोडल्याबद्दल निर्मात्यांनी पलकला कायदेशीर नोटीस पाठवल्याचे वृत्त समोर आले होते पण अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले. मात्र त्यानंतर नीला टेलिफिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने नोटीस पाठवल्याचं निवेदन जारी केलं तर दुसरीकडे पलकच्या टीमनेही एक निवेदन जारी करत शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले आहेत.
या निवेदनात नीला टेलिफिल्म्सने म्हटलं आहे कि, पलकने निर्मात्यांबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केलं आहे. तिने मालिकेशिवाय इतर ठिकाणीही काम केली असल्यामुळे प्रॉडक्शन हाऊसचे नुकसान झालं आहे. याबाबत तिला अनेकदा ताकीद देण्यात आली असूनही तिने बऱ्याचदा या नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे निर्माते नाराज झाले असून त्यांनी तिला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवली.
तर यावर पलकच्या टीमने असं म्हटलं आहे कि, तिने या शोमध्ये पाच वर्षं काम केलं आहे, 8 ऑगस्ट रोजी तिने निर्मात्यांना ही मालिका सोडण्याचा निर्णय कळवला होता. त्यांनी तिला रिझाईनचा मेल करण्यासाठी ऑफिशिअल मेल आयडी देणार असल्याचं सांगितलं होत पण तसं काहीच झालं नाही असं ती म्हणाली. तिने निर्मात्यांवर मानसिक छळाचाही आरोप केला आहे. तिला पॅनिक अटॅक येत असून या संदर्भात तिला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली असं तिने सांगितलं. इतकाच नाही तर निर्मात्यांना तिने केलेल्या कामाची कल्पना होती आणि तिला परवानगी दिली होती असंही निवेदनात म्हटलं असून तिच्याबरोबर केलेल्या कराराची कॉपी अजून तिला देण्यात आली नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
या आधीही तारक मेहता मालिकेचे निर्माते कलाकारांनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. कलाकार आता यावर काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.