सुरक्षा व न्यायच्या मंदिरात ‘तेजोमय’ दीपावली
सांगोला पोलीस स्टेशन रांगोळी व पणतीच्या प्रकाशाने उजळले....
सांगोला : प्रतिनिधी
पोलीस म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी हक्काचे आधारवड असते तर पोलीस स्टेशन म्हणजे न्याय देणारे ‘न्याय मंदिर’ असते, पंरतु यांच्या खाकीतील ‘देवमाणसाला ‘ अनेक वेळा आपल्या कुटूंबासोबत सण व उत्सव सहसा साजरा करता येत नाही. कर्तव्य हेच प्रथम म्हणून २४ तास शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना झटावे लागते.
सद्या महाराष्ट्र विधासभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून दुसऱ्या बाजूला दीपावली सारखा सणही सुरू आहे, अश्या वेळी आपल्या कुटूंबासोबत असावे असे प्रत्येकाला वाटते. तरीही पोलीस बांधव कर्तव्यावर असल्याचे दिसते.
पोलीस स्टेशन हेच आपले घर आणि पोलीस कर्मचारी हेच कुटुंब समजून पोलीस स्टेशनमध्ये साधेपणाने दीपावली साजरी होत आहे.
पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढून व दीप लावून महिला पोलीस भगिनींनी ‘सुरक्षा व न्यायाच्या मंदिरात’ रोषणाई केली आहे. जरी पणतीचा प्रकाश थोडा वाटत असलेतरी, सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आशेचा ‘सूर्य ‘ आहे.