विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणारा ‘तो’ शिक्षक निलंबित
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच हे प्रकरण माहिती असतानाही संबंधित शिक्षकावर कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापकालाही निलंबित केल्याचे शिक्षणाधिकारी भिकाजी कासार यांनी सांगितले.
संजय मुळ्ये असे त्या शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यासाठी तीन महिला अधिकारी असलेली चौकशी समिती नेमली. त्यामध्ये शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश होता. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
अहवालानुसार, हा प्रकार गेले काही दिवस सुरू असल्याचे पुढे आले. या प्रकाराची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनाही माहिती असल्याचे पुढे आले. दरम्यान, त्या शिक्षकाने एका मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्यामुळे मुलीनेच पालकांना माहिती दिली. त्यानंतर तिच्या पालकांसह ग्रामस्थांनी त्या शिक्षकाविरोधात कडक धोरण अवलंबिले. त्यामुळे या प्रकरणी त्या शिक्षकावर कारवाई झाली.
दरम्यान, संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असा प्रकार केल्याचे चौकशी अहवालात पुढे आले आहे. त्याची गंभीर दखल शाळेतील वरिष्ठांनी घेतली नाही. मुख्याध्यापकावरही शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्या शाळेतील अन्य एका शिक्षिकेला माहिती वेळीच का पोहोचवली नाही, अशी कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले.
कडक सूचना संगमेश्वर तालुक्यातील प्रकार घडल्यानंतर शनिवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार शिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रत्येक शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे, अशा कडक सूचना दिल्या आहेत. संशयास्पद प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना द्या, अशा सूचना शिक्षणाधिकारी कासार यांनी दिल्या आहेत. तसेच सखी समितीच्या बैठका घेणे, तक्रार पेट्यांची तपासणी करणे, या गोष्टींची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याचे आदेश सीइओंनी दिले आहेत.