बदलापूरमधील आंदोलन हे तर राजकीय स्टंट : भाजप आमदार कथोरे

बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. बदलापूरमध्ये तर लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी आंदोलकांची आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात बसलेले आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर भाजप आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर संताप व्यक्त होतोय. कथोरे म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु सुरु असलेलं आंदोलन भरकटलं आहे. शाळा सोडून लोक रेल्वेकडे वळले. जे आंदोलक ट्रॅकवर आंदोलन करत आहेत ते बदलापूरचे नसून बाहेरुन आलेले आहेत.
आमदार कथोरे पुढे म्हणाले की, लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात आलेली असून संस्थाचालकाची चौकशी होणार आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवून बदलापूरकरांना वेठीस धरलंय. आंदोलन बघून ही ठरवून केलेली स्टंटबाजी असल्याचं कथोरे म्हणाले.
गिरीश महाजन यांची विनंती धुडकावली
सरकारच्यावतीनं आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन आले होते. नागिरकांनी शांत राहण्याची विनंती त्यांनी केली. मात्र संतप्त नागरिकांनी त्यांच्या विनंतीलाही जुमानलं नाही. महाजन यांच्याशी चर्चा करताना एक आंदोलक म्हणाली, “आपल्या महाराष्ट्रात हे कायदे बसत नाहीत ते कायदे बसत नाहीत असं सांगितलं जातं म्हणूनच असे गुन्हे घडत आहेत. तुम्ही ज्याला अटक केली आहे त्याला इथं आमच्यासमोर आणा. असं व्हायला नाही पाहिजे, तुमची विनंती इथं कोणीही ऐकणार नाही. कोणाकोणाला तुम्ही गप्प करणार आहात”
तर दुसऱ्या एका संतप्त महिलेनं थेट गिरीश महाजन यांना सवाल करत म्हणाली, “तुम्ही म्हणता आहात की फाशी होणार नाही एवढ्यात, कायद्यानं सर्व ठीक होणार आहे. या ठिकाणी जर तुमची मुलगी असतील तर काय केलं असतं?”
उपमुख्यमंत्र्यांचे ट्वीट
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. ”
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. #Badlapur
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024