नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 8 फेब्रुवारीला निकाल लागेल. दरम्यान, आजच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरादर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आतिशी यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, पीडब्ल्यूडी विभागाच्या म्हणण्यानुसार, सीएम आतिशी यांनी 6 फ्लॅग स्टाफ रोडचा प्रत्यक्ष ताबा घेतला नाही. वारंवार स्मरण करूनही आतिशी यांनी त्या घरात प्रवेश केला नाही. आतिशींच्या सांगण्यावरून घरात बदलही करण्यात आले, पण त्या घरात शिफ्ट झाल्या नाहीत. यानंतर या घराची मंजुरी रद्द करण्यात आली.
आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भाजपची जी व्यवस्था आपण पाहिली आहे, त्यावरून भाजपला दिल्लीतील जनतेची काळजी नसल्याचे दिसते. वर्षभर भाजपचा एकच अजेंडा होता की आप नेत्यांवर खटला कसा चालवायचा. त्यांना तुरुंगात कसे पाठवायचे. तुरुंगात औषधोपचार कसे थांबवायचे. आज देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपने असे काम केले आहे जे यापूर्वी कोणी कधीही केले नव्हते. एका महिला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकृत घरातून हाकलून देण्यात आले आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, ज्यांनी दिल्लीत काम केले त्यांना मतदान करा आणि ज्यांनी काम बंद केले त्यांना मत देऊ नका. भाजप नेते रमेश बिधुरी यांच्यावर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. आता त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? रमेश बिधुरी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला गेला तर निवडणूक आयोग निष्पक्ष आहे असे मी मानू शकतो.
त्याचवेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी खोटे बोलत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यांना 11-ऑक्टोबर-2024 रोजी मुख्यमंत्री निवासस्थान देण्यात आले. त्यांनी अजूनही ते ताब्यात घेतलेले नाही कारण त्यांना अरविंद केजरीवालांना नाराज करायचे नाही. त्यामुळे हे वाटप मागे घेण्यात आले आणि त्याबदल्यात त्यांना आणखी दोन बंगले देऊ करण्यात आले.