अनैतिक संबंधातून शिक्षिकेने केली प्रियकराची हत्या
आपल्या विद्यार्थ्यांनाच िदली दोन लाख रुपयांची सुपारी

नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती, नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.
आरोपी महिला शिक्षकेचं नाव भावना कदम असं असून नाशिकमधल्या एका शाळेत ती भूगोल हा विषय शिकवते. म्हसरुळच्या मेरी कपांऊंडमध्ये राहाणाऱ्या पंचवीस वर्षांच्या गगन कोकाटेशी तिची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु झालं. आरोपी भावना कदम ही घरी ट्यूशनही घेतली होती. यासाठी गगन तिला विद्यार्थी मिळवून देण्यास मदत करायचा. तीन वर्ष भावना आणि गगनचं प्रेमप्रकरण सुरु होतं. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु झाले होते. कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यातला वाद विकोपाला जात होता.
भावनावरच्या रागातून गगन तिचा पती आणि दोन मुलांनाही त्रास देऊ लागला होता. त्यामुळे आरोपी भावनाने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी तीने शाळेतल्या विश्वातील दोन विद्यार्थ्यांना हत्येची सुपारी दिली. यासाठी दोन लाख रुपये देण्याचं ठरलं. यातले एक लाख रुपये तीने आधी दिले, तर हत्येनंतर एक लाख रुपये देण्याचं ठरलं.
रात्रीच्या सुमारात विद्यार्थ्यांनी गगनला रस्त्यात गाठलं आणि त्याच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या केली. ज्या वेळी हत्या झाली त्यावेळी भावना कदमही त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यानंतर सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळेस देखील भावना कदम तिकडे पोहोचली आणि गगन मृत झालाय याची खात्री करुन घेतली. पण गगनच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठिमुळे सर्व कट उघडकीस आला. पंचवटी पोलिसांनी अवघ्या चार तासात मारेकरी ताब्यात घेतले आहे यात दोन विधीसंघर्षित बालकांसह 5 जणांना अटक केली आहे. यात संकेत दिवे (20) मेहफूज सय्यद (18), रितेश सपकाळे (20) गौतम दुसाने (18) आणि मुख्य आरोपी भावना कदम यांना ताब्यात घेतले आहे.