हैद्राबाद : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. या हत्या प्रकरणातील क्रूरता अतिशय भयावह पद्धतीची होती. या हत्या प्रकरणात आरोपीने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. अशीच एक धक्कादायक घटना हैद्राबाद येथे घडली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे.
पोलीस निरीक्षक नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरूमूर्ती (वय वर्ष ४५) हे माजी सैनिक आहेत. सध्या कांचनबाग येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरूमूर्ती यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना २ मुले आहेत. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र एके दिवशी दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. पत्नीसोबत टोकाचे भांडण झाल्यामुळे आरोपीने पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं.
आधी कडाक्याचे भांडण झाले, नंतर पत्नीची हत्या केली. बाथरूममध्ये पत्नीचा मृतदेह नेत त्याचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकत उकळवून घेतलं. नंतर मास आणि हाडं वेगळे करून तलावात फेकून दिलं. पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण समोर आलं. तसेच चौकशी केली असता, पती आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.
आठडाभरापूर्वी मृत महिलेच्या कुटुंबियांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली. मृत महिलेच्या पतीची चौकशी केली असता, आरोपी पतीनं पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं. नंतर पत्नीची हत्या कशी केली, याबद्दल माहिती दिली. भांडणातून पत्नीची हत्या केली असल्याचं त्याने सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.