अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना मिळणार 25 हजार रुपये
नागपूर : रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकदा रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास आजूबाजूच्या लोक मदत करणे टाळतात. तर काही जण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाही. मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्र सरकार त्यांना आता 25 हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे.
याआधी अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जात होते. आता या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. रस्ते अपघातात जखमींची मदत करणाऱ्यांना आता 5000 ऐवजी 25 हजार रुपये देणार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या रकमेत तब्बल पाच पटीने वाढ करण्यात आली आहे.
नागपुरात एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय मंत्री गडकरी असे म्हणाले. देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावे यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी ?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे मी निर्देश दिले आहेत. सध्या दिले जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाणार आहे,” अशी माहिती गडकरी यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.