तरूणाच्या त्रासाला कंटाळून भावी डॉक्टर तरूणीची आत्महत्या
सलीम अली सरोवरात आढळला मृतदेह, तरूणाविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : सलीम अली सरोवरात एका तरूणीचा मृतदेह गुरूवारी २२ ऑगस्टला आढळुन आला होता. याप्रकरणी तरूणीची ओळख पटली असून तिने तरूणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अपूर्वा दिलीप गजहंस (२१, रा. राणा पेट्रोल पंपाच्या मागे, पडेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे तर, किरण कांबळे (२१) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अपूर्वा आणि किरण हे अकरावीला सोबत शिकत होते. तेव्हाच त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे अपूर्वा संगमनेर येथील अश्वीन रुरल आयुर्वेदिक कॉलेज येथे बीएएमएसचे शिक्षण घ्यायला गेली. इकडे किरणने शहरातील एका कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले. त्यांच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्यावर त्यांच्यातील मैत्री कमी झाली. प्रेमसंबंधही कमी झाले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून किरण पुन्हा अपूर्वाच्या संपर्कात आला. १७ आॅगस्टला अपूर्वा रक्षाबंधनासाठी घरी आली. २० आॅगस्टला ती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून बाहेर गेली. मैत्रिणीसोबतच ती निरालाबाजार भागात किरणला भेटली. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढू नये म्हणून हा प्रकार अपूर्वाच्या मैत्रिणीने तिच्या आईला सांगितला. दरम्यान, आईने बोलावले म्हणून अपूर्वाची मैत्रीण तेथून गेली. तेव्हा अपूर्वा एसबी कॉलेजच्या पार्किंगमध्ये होती. तिची आई तिला घ्यायला गेली तेव्हा ती तेथे नव्हती. तिचा मोबाइलही ती उचलत नव्हती. तेव्हाच तिच्या आईने छावणी ठाणे गाठून बेपत्ताची नोंद केली होती. अपूर्वाचे शेवटचे लोकेशनही सलीम अली सरोवर परिसरच आले होते.
वेगळ्या जातीची असल्याने लग्नास नकार
अपुर्वा व किरण कांबळे या दोघांचे उच्चमाध्यमिक शिक्षण हे असल्यामुळे दोघांची ओळख होती. मागील काही दिवसांपासून दोघांचे प्रेमसंबध होते. दोन महिन्यांपुर्वी अपुर्वाने लग्न करण्याचा तगादा लावला होता. परंतु किरणने तु वेगळ्या जातीची असून लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. तरी सुध्दा किरण हा अपुर्वाच्या वेळोवेळी संपर्क करून तिला त्रास देत असल्याचे अपुर्वाच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी किरणविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहेत.