मावळमध्ये 98 किलो गांजा जप्त, चौघांना अटक
पुणे – लोणावळ्याच्या दिशेने कार मधून 98 किलोचा गांजा विक्रीस घेऊन जाणाऱ्या चौघांना कामशेत पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. यामध्ये 48 लाख रुपये किंमतीचा 98 किलो गांजा व कार असा मोबाईल असा एकूण 56 लाख 98 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अभिषेक अनिल नागवडे (वय 24) प्रदिप नारायण नामदास (वय 25), योगेश रमेश लगड (वय 32) वैभव संजीवन चेडे, (वय 23) हे सर्व राहणार पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांव तालुका शिरूर जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरूवार (दि 22) रोजी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना सिल्व्हर रंगाची वेरना कार मधून 4 इसम ताजे ता.मावळ हद्दीतून जुने हायवे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे गांजा वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिकी मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक वेरना कार नंबर एम.एच 14 जी.वाय 0550 हि जुने हायवे मार्ग ताजे गावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता कारच्या डिकीमध्ये एकूण 98 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला या छाप्यामध्ये एकुण 98 किलो वजनांचा गांजा एकूण 48 लाख 50 हजार रूप्ये किंमतीचा गांजा तसेच 8 लाख रूपये किंमतीची वेरना कार, 42 हजार रूपये किंमतीचे 3 मोबाईल हँडसेट असे एकूण 56 लाख 92 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, पंकज देशमुख अपर पोलीस अधिक्षक, रमेश चोपडे सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर, रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी केली.