पहाट’ उपक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हेगार वस्त्यांना भेट
सोलापूर ग्रामीण पोलीसांनी 'दीपावली' केली गोड
सांगोला : प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी व पोलीसांचा जनतेशी अधिक – अधिक संपर्क वाढण्यासाठी पहाट” हा उपक्रम सुरू केला आहे.
सदरच्या कौतुकास्पद उपक्रमात पोलीस अधिकारी हे गुन्हेगार वस्तीमध्ये जावून तेथील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवत आहेत.
तसेच तेथील लोकांना गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी प्रबोधन करत असून पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यांमध्ये जावून त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा मंत्र दिला आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी यांनी सद्या सुरू असलेल्या दिवाळी सणाच्या निमीत्ताने पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार वस्त्यांवर जात आहेत. पोलीस अधिकारी हे वस्त्यामधील लहान मुलांना फटाके, फराळ देवून त्यांच्याशी संपर्क करत आहेत.
त्यामध्ये अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महेश स्वामी यांनी मुगळी, ता. अक्कलकोट येथे, वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी धोत्री व कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर येथे तर पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. काटकर यांनी पांगरी येथे जावून तेथील लहान मुलांना फटाके वाटप केले आहेत तर मागास कुटूंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले आहे.
यामुळे वस्त्यांमधील लोक पोलीसांशी आपुलकीने संवाद साधत आहेत. तसेच यापुढे गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. त्यासाठी त्यांना शासनाचे विविध योनजांची लाभ मिळूवन देण्यासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या या सवांदामुळे मुलांच्या चेहऱ्यावर दिलासा व समाधान दिसून येत आहे.
आगामी काळातील महत्वपूर्ण बंदोबस्तानंतर ‘पहाट’ उपक्रमांसाठी अधिक वेळ देवून सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.