रश्मी शुक्ला प्रकरणी शरद पवारांकडून निवडणुक आयोगाचे कौतुक
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सध्याच्या राज्याच्या पोलीस महासंचालक ‘रश्मी शुक्ला’ यांची अखेर बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचे दिसत आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपध्दती अत्यंत वादग्रस्त असून त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बाेलले जाते.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा पदभार देण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच शुक्लनंतरच्या तीन अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत ही नावे देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रश्मी शुक्लांची बदली झाली यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. नुकतंच शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती.
या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर बोलताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली. “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात.
रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.