महाराष्ट्रराजकारण

खासदार व्हायचे होते झाले आमदार, तुमचीच नजर लागली : पंकजा मुंडे

परळी : परळी मतदारसंघातील निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सर्व राज्याचे लक्ष या मतदारसंघात लागले आहे. येथून अजित पवार गटाचे धनजंय मुंडे उभे असून त्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. आज निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काल परळीत महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपच्या सरचिटणीस आणि विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण बनलं आहे.

परळीचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, “खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं”.असेही त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश…? काय दत्ताभाऊ…? खरं आहे की नाही? पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता… आले मी परत तिथेच… खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले”.

दरम्यान, पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, “माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button