पोलीस पाटील आत्महत्या प्रकरणी पो. नि. भडीकर यांच्यावर गुन्हा दाखल

हदगाव : तालुक्यातील पेवा येथील पोलिस पाटील बाळासाहेब जाधव (वय ५०) यांनी २२ जुलै रोजी हदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत कर्यायात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी २३ जुलै रोजी पोलिस निरीक्षक भडीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी पो. नि. भडीकर यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ करून गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर पोलीस निरीक्षक भडीकर अन्याय करीत आहेत. आणि माझ्या आत्महत्येस भडीकर हेच जबाबदार आहेत असा उल्लेख, त्या व्हिडिओमध्ये केला आहे. गावातील एका घटनेची माहिती दिल्यानंतर त्या संदर्भाची माहिती ते लपवत होते, असे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले.
मागील पंधरा दिवसापूर्वी गावातील एका व्यक्तीचा खून झाला होता. हा खून जातीयवादातून झाला असल्याची माहिती देण्यात आली. याबाबतची माहिती पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी लपविली असा पोलिसांचा समज होता, अन् याबाबतची विचारणा पोलीस निरीक्षक भडीकर यांनी बालाजी जाधव यांना केली होती, पण आपल्यावर खोटा आरोप होत असल्याने आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडिओ बनवला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. घटनेची माहिती मिळताच भोकरचे डी. वाय. एस. पी. डॅनियल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक खंडेराय धरणे, पोलिस अधीक्षक कृष्णा कोकाटे हदगाव ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत होते. २३ जुलै रोजी मयताच्या मुलगा अनिकेत बाळासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्या नंतर पेवा येथे त्यांच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.