बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती गंभीर
मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतील लहानमुलींवर अत्याचार प्रकरणात अटक असलेला आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयने स्वतःवर गोळी चालवली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेला एक पोलिस देखील गंभीर जखमी झाला आहे.
अक्षय याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एका पोलिसाची बंदूक त्याने हिसकावली. आणि स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्याल देखील लागली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. दोन दिवसापूर्वी अक्षयने त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले होते.
शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते.