गंधोरा शिवारात शेतजमिन मोजणीच्या वादातून तंटामुक्त अध्यक्षावरच कोयत्याने हल्ला; ९ जणांवर गुन्हे दाखल, चौघांना अटक

धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील तंटामुक्त अध्यक्ष संतोष मुसळे हे गंधोरा शिवारातील शेतजमीन मोजणीसाठी काही प्रतिष्ठित नागरिकांना पंच म्हणून तेथे घेऊन गेले होते. त्या ठिकाणी आरोपी शेतजमीन नांगरत होते. हे पाहून मुसळे म्हणाले की, शेतीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेखचे अधिकारी येणार आहेत. आता तुम्ही शेती नांगरू नका आता थांबा, असे म्हणल्यावर आरोपींनी तुम्ही आमच्या शेतात का आलात, आम्हाला पंच, तंटामुक्त अध्यक्ष कोणच माहित नाही, आम्ही यांना जुमानत नाही. असे म्हणत शिवीगाळ केली, या झालेल्या बाचाबाचीतून आरोपींनी तंटामुक्त अध्यक्षावरच कोयत्याने हल्ला करून मारहाण केली. आणि प्रवीण भोसले यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना सुद्धा लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी फिर्यादी – संतोष धनाजी मुसळे (वय ४८ वर्षे) रा.गंधोरा, ता.तुळजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.(बीएनएस) २०२३ कलम १०९, ११८ (१), ११५(२),३५२,१८९(२), १९१(२), १९१(३), १९० अंतर्गत ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या मधील काही आरोपींवर आधीच गुन्हे दाखल आहेत. तेव्हा यांच्यामुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. विशेष म्हणजे संतोष धनाजी मुसळे (वय ४८ वर्षे) हे आठ वर्षांपासून तंटामुक्त अध्यक्ष म्हणून काम पाहतात,त्यांनी आजतागायत गावातील नागरिकांना भांडणांपासून-गुन्ह्यांपासून परावृत्त ठेऊन गावातील, कुटुंबातील वाद-तंटा गावातच समोपचाराने मिटवलेले आहेत. मात्र आता तंटामुक्त अध्यक्षावरच हल्ला झाल्याने जर तंटामुक्त अध्यक्षच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्या मुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार (दि.१८ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विमल पंडीत राठोड व प्रविण नागनाथ भोसले यांची गंधोरा शिवारातील शेताची सरकारी मोजणी असल्याने तंटामुक्त अध्यक्ष संतोष मुसळे आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक हणमंत पांडुरंग जाधव, प्रभाकर श्रीपती भोसले, शामराव विजयकुमार मुसळे हे सर्व पंच म्हणून गेले होते. पण त्या ठिकाणी शेतजमीन मोजणी अधिकारी येण्याच्या अगोदरच १) वालचंद नामदेव राठोड, २) विठ्ठल पंडीत राठोड, ३) नामदेव धर्मा राठोड, ४) बालाजी नामदेव राठोड, ५) पंडीत धर्मा राठोड, ६) सविता नामदेव राठोड, ७) शांताबाई नामदेव राठोड, ८) विमल पंडीत राठोड, ९) प्रियंका वालचंद राठोड, सर्व रा.गंधोरा, ता.तुळजापुर यांनी एकत्र मिळून आपसात संगनमत करून गंधोरा शिवारातील प्रविण भोसले यांची मालकी वहिवाटीची शेत गट नं.५१ (ब) मधील शेतजमिनीत ट्रॅक्टरने शेती नांगरत असताना त्यांना पंचांनी सांगितलं कि, शेतीची मोजणी करण्यासाठी भुमि अभिलेखचे अधिकारी येणार आहेत तुम्ही शेती का नांगरता थांबा, असे म्हणताच वरील आरोपी पंचांना म्हणाले कि, तुम्ही आमचे शेतात का आलात, आम्हाला पंच किंवा तंटामुक्त अध्यक्ष हे कोण आहेत आम्हाला माहीत नाही. या मध्ये बाचाबाची झाल्यावर सर्वांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यात विठ्ठल पंडीत राठोड याने शिवीगाळ करुन मुसळे यांच्या गच्चीस धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना वालचंद नामदेव राठोड याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने संतोष मुसळे यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या बोटावर मारुन गंभीर जखमी करुन खाली जमीनीवर पाडून मारहाण केली. व प्रविण नागनाथ भोसले यांच्या डोळ्यात नामदेव धर्मा राठोड यांनी चटणी टाकुन शिवीगाळ करीत असताना बालाजी नामदेव राठोड याने प्रविण यास दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच हानमंत पाडुरंग जाधव यास सविता नामदेव राठोड, शांताबाई नामदेव राठोड, विमल राठोड यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने छातीवर, पाठीवर मारहाण करुन मुक्कामार दिला. सविता राठोड हिने डाव्या हातावर दाताने चावा घेऊन जखमी केले. तसेच नवनाथ शहाजी भोसले यास पंडीत राठोड, प्रियंका वालचंद राठोड, विमल राठोड यांनी शिवीगाळ करुन त्यास खाली पाडून डोळ्यात चटणी टाकुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना विठ्ठल पंडीत राठोड याने लोखंडी कोयत्याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यावर आणि उजव्या हाताचे बोटावर मारुन मुसळे यांना गंभीर जखमी केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर ३ महिला आणि १ पुरुष यांना अटक केली आहे तर ५ आरोपी फरार आहेत, पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.