अमित शहा आणि विनोद तावडे यांची दिल्लीत बैठकी, फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मराठा आरक्षणाचा धोंडा
नवी दिल्ली : गुरुवारी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वीच विनोद तावडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत ‘मुख्यमंत्रीपदावर मराठा आरक्षणाचा काय परिणाम होणार आहे’ या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मराठा मुख्यमंत्री द्यायचा का? यावरून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय रखडला आहे का? असा प्रश्न आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारल्यानंतर एकवटलेला मराठा समाज, याचा राज्याच्या मुख्यमंत्री निवडीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात मराठा आरक्षणाचा धोंडा पडलेला दिसत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि तावडे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विद्यमान परिस्थिती आणि आगामी काळ पाहता राज्यात होत असलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महाराष्ट्रातील जातीय- सामाजिक समीकरणे या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाल्याची समजते.
२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले, असे असतानाही आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि विनोद तावडे यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज गुरुवारी (दि.२८) दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक होत आहे. दिल्लीत होणार्या या बैठकीत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. यासोबतच पालकमंत्री, महामंडळे आणि भविष्यात येणार्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांचीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुतीने राज्यात २३० जागा मिळवल्या आहेत. भाजप हा १३२ जागां जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. पण, निकाल लागून पाच दिवस उलटले तरी अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण? यावरुन सस्पेन्स संपलेला नाही. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करण्यात आला. शिवसेनेचे नेते, आमदारांनी तशी इच्छा बोलून दाखवली. मात्र, बुधवारी (२७ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.