कपिल पिंगळे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शिवराम ठोंबरेसह पोलीस कर्मचारी अविनाश ढगे यांना अटक करा
लोकस्वराज्य आंदोलन संघटनेसह कपिलच्या कुटुंबीयांची मागणी; गुन्हे शाखेवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : रांजणगांव येथील कपील पिंगळे हत्या प्रकरणातील मास्टरमाइंट हा शिवराम ठोंबरे व पोलिस कर्मचारी अविनाश ढगे असून त्यांना सह आरोपी करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कपीलच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गुरूवारी २५ जुलैला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्ही. जे डोइवाड, रावसाहेब पवार, बी.आर पारसकर यांच्यासह कपीलचे कुटुंबीय उपस्थित होते.
कपील हा शिवराम ठोंबरेकडे कामाला होता. परंतु मागील काही वर्षापासून त्याने काम सोडले होते. तसेच तो शिंदेसेनेत सहभागी झाला होता. ठोंबरे हा रांजणगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच आहे. ठोंबरे पोलिस कर्मचारी अविनाश ढगे सोबत पार्टनरशिप करून अवैध धंदे चालवितो. ठोंबरे याला कपिल याने अवैध धंदे बंद करा असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा ठोंबरे याने तुला खल्लास करून टाकतो अशी धमकी देखील दिल्याचे कपिलच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्याच वर्चस्ववादातुन कपिल याची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. तसेच शहरातील अवैध धंद्याकडून पोलीस कर्मचारी अविनाश ढगेच्या मार्फत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे हे हप्ता घेत असल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणाचा तपास हा योग्य पद्धतीने होत नसून या खुनाचा तपास सीआयडीकडे देऊन दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. ५ ऑगस्टपर्यंत आरोपीला अटक न केल्यास संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
ठोंबरे मामा कुठंय; त्याला अटक करा – कपिलच्या आईची मागणी
पोलिसांनी अटक केलेलया चार आरोपींनी पोलिसांना कबुली जवाब दिला. त्यात कपीलने आरोपी फत्तेलश्कर याच्या हत्येची सुपारी घेतल्याचे समजल्याने त्यांनीच कपिलची गोळ्या घालून, चाकूने १७ वार करत हत्या केल्याचे सांगितले. त्यावर कपिलच्या आईने म्हट्ले कि, माझ्या मुलाने जर सुपारी घेतली असती तर कपील त्यांच्यासोबत एकटा गेला असता का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कपील हा गेल्या दहा वर्षांपासून ठोंबरेकडे काम करत होता. ठोंबरे कपिल याला भाचा मानत होता. त्याने कपिलची हत्या झाल्यापासून एकदाही आला नाही. मग तो फरार का झाला. असे म्हणत ठोंबरेनेच कपिलची हत्या केली आहे. त्यामुळे पोलिसांनी माझ्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी करताना त्यांना अश्रु अनावर झाले होते.